ब्युरो टीम : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहामध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे दर्शन घडवले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक विनोद लोंढे, अशोक चोरमले, बेबीताई गायकवाड, शाहिद काझी, विजय तमनर, कांतीलाल जाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमातून भटक्या विमुक्तांच्या जीवनपद्धती, चालीरीती व संस्कृतीचे दर्शन घडवले. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी बंजारा नृत्याविष्कारातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवले व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटांतील विजेत्या सामूहिक गटांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण नऊ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आले. तसेच दहावी व बारावी (कला व विज्ञान शाखा) परीक्षेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय इस्रोच्या वैज्ञानिक सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
सहाय्यक संचालक विनोद लोंढे म्हणाले, “ब्रिटिश सरकारला विरोध करण्यात भटक्या विमुक्त समाजाची भूमिका महत्वाची होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने इंग्रजांनी लागू केलेला ‘भटक्या जमाती गुन्हेगार कायदा’ रद्द करून या समाजाला मुक्त केले.” आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराचेही त्यांनी कौतुक केले.
अशोक चोरमले यांनी भटके विमुक्तांची संघर्षगाथा व त्यांच्या समस्यांबाबत माहिती दिली. बेबीताई गायकवाड यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निरीक्षक कातकडे यांनी इतर मागास बहुजन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व भटके विमुक्त दिवस साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कुरुंद आश्रमशाळेचे प्राध्यापक शाकीर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शासकीय वसतीगृहातील कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा