MP Nilesh Lanke : शिक्षक समाजाचे खरे शिल्पकार – खासदार नीलेश लंके

विक्रम बनकर, अहिल्यानगर  : 'शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या त्याग, निष्ठा आणि कार्यामुळेच समाजाचे सामाजिक व वैचारिक स्वास्थ्य टिकून आहे. नवीन पिढीला योग्य दिशा देणे, मूल्यांचे शिक्षण करणे आणि समाजाला मजबूत बनवणे हे कार्य शिक्षक आजही तितक्याच जोमाने करत आहेत. त्यामुळे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे,' असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.

अहिल्यानागर येथे माजी नगरसेवक योगीराज गाडे मित्र मंडळातर्फे आयोजित शिक्षक गौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, माजी प्राचार्य भास्करराव झावरे, नाशिक विभागातील शिक्षक नेत्या शुभांगी पाटील, उद्योजक नवनाथ धुमाळ, प्रा. भास्करराव जऱ्हाड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश जाधव, अंबादास शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, 'डिजिटल युगात शिक्षकांचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ते ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचवतात. महान व्यक्तींच्या यशामागे त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद असतो.'

'विदेशात शिक्षकांबद्दल असलेला आदर अतुलनीय आहे. आपल्या देशातही शिक्षकांविषयी अधिक आदर, सकारात्मक दृष्टीकोन आणि कृतज्ञतेची भावना वाढली पाहिजे,' असे प्रतिपादन डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.  कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमला यशवंत माध्यमिक विद्यालय, श्री गणेश बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका तसेच अनेक मान्यवर शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.  शिक्षक दिनानिमित्त आयोजित हा समारंभ प्रेरणादायी ठरला. समाजाच्या घडणीत शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांविषयी आदर, कृतज्ञता आणि जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक  माजी नगरसेवक योगीराज गाडे, सूत्रसंचालन  योगेश गुंड,तर आभार सचिन कराळे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने