PCMC :पिंपरी चिंचवड महापालिकेचे नेहरूनगरमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे नेहरूनगर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३०० हून अधिक नागरिकांनी वैद्यकीय सेवा व विविध तपासण्यांचा लाभ घेतला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे, डॉ. गोविंद नरके, पीएचएन यशस्विता बाणखेले तसेच वायसीएम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, आशा सेविका, परिचारिका उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांसाठी रक्त तपासणी, लसीकरण, एक्स-रे, गरोदर मातांची तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नागरिकांना घेता आला. सर्व तपासण्यांसोबत आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतात. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा महापालिकेचा उद्देश असून यासाठी सातत्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिरासोबतच इतर वेगवेगळे विविध उपक्रम राबवण्यात येतात.

विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मोफत महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तपासण्या, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व औषधोपचार मिळतात. अशा शिबिरांमुळे आरोग्य तपासणीबाबतची सवय निर्माण होते आणि रोग वेळेत निदान होऊन उपचार होण्यास मदत मिळते.

डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने