Ahilyanagar :दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांप्रती अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

ब्युरो टीम : दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक समाजातील एक महत्त्वाचा घटक आहेत. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, २०१६’ च्या कलम ३९ अन्वये तसेच ‘ज्येष्ठ नागरिकांचा देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ अन्वये संवेदनशीलता-जागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे, सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या स्वाभिमानाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यादृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटकांप्रती संवेदनशील राहून त्यांना आधार द्यावा, जेणेकरून ते समाजात ताठ मानेने उभे राहू शकतील आणि आनंदी आयुष्य जगू शकतील.”

मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी म्हणाले, “दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांप्रती सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळमळीने काम करणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासह समाजाचा अभिमानास्पद भाग म्हणून उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग कल्याण निधीचा योग्य विनियोग करून दिव्यांगांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळाला पाहिजे. विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यांना समाधानाने, आनंदी आयुष्य जगता येईल.”

प्रास्ताविकात देवीदास कोकाटे यांनी सांगितले की, शासकीय अधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या हक्कांबाबत, संबंधित कायद्यांबाबत तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींबाबत अधिक संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात दिव्यांग हक्क अधिनियम, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन, सुगम्य भारत अभियान, ज्येष्ठ नागरिक कायदा, कौशल्य विकास योजना आणि विविध कल्याणकारी योजनांबाबत विधी अधिकारी राजेश मोरे, डॉ. दीपक अनाप, डॉ. जी. पी. शेख, संजय साळवे व शुभदा पाठक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांनी आभार मानले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने