दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात साफसफाई केली जाते. या काळात अनेकदा जुन्या झालेल्या खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी अनेक वस्तू फेकून दिल्या जातात. या वस्तू रस्त्यावर टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते. परंतु, या वस्तू योग्य मार्गाने ‘आर.आर.आर. केंद्रा’त दिल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन गरजूंना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तू महापालिकेने सुरू केलेल्या आर.आर.आर. सेंटरमध्ये जमा करा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संगम साधण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरभर विविध प्रभागांमध्ये आर.आर.आर. केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये नागरिकांनी आपल्या घरातील चांगल्या स्थितीतील, पण घरामध्ये वापरात नसलेल्या वस्तू जमा कराव्यात. जमा झालेल्या वस्तूंचे पुनर्वापर, पुनर्निर्मिती किंवा गरजूंना पुनर्वितरण केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
आपण कोणत्या वस्तू जमा करू शकतो?
पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या इतर वस्तू.
आर.आर.आर. केंद्रांची ठिकाणे:
अ क्षेत्रीय कार्यालय:
कापसे उद्यान, मोरवाडी (प्र. १०), आकुर्डी भाजी मंडई (प्र. १४), संत तुकाराम महाराज गार्डन (प्र. १५), श्रीधरनगर गार्डन (प्र. १९)
ब क्षेत्रीय कार्यालय:
एसकेएफ कंपनी शेजारी, थेरगाव (प्र. १७), हेडगेवार पूल, दर्शननगरी (प्र. १८), धर्मराज चौक, रावेत (प्र. १६), ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्र. २२)
क क्षेत्रीय कार्यालय:
हेडगेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्र. ९), धावडे वस्ती, भोसरी (प्र. ६), संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्र. २), संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्र. ८)
ड क्षेत्रीय कार्यालय:
लिनियर गार्डन, कोकणे चौक (प्र. २८), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्र. २६), तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्र. २५), प्रभाग कार्यालय क्र. २९
इ क्षेत्रीय कार्यालय:
मोशी चौक (प्र. ३), दिघी जकात नाका (प्र. ४), राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी (प्र. ५, ७)
फ क्षेत्रीय कार्यालय:
वृंदावन, चिखली (प्र. १), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्र. ११), रूपीनगर पोलिस चौकी (प्र. १२), शनि मंदिर, सेक्टर २१ (प्र. १३)
ग क्षेत्रीय कार्यालय:
थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर (प्र. २३), मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्र. २४), पिंपरीगाव बसस्टॉप (प्र. २१), आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्र. २७)
ह क्षेत्रीय कार्यालय:
छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्र. २०), सितांगण गार्डन (प्र. ३०), कै. काळुराम जगताप तलाव (प्र. ३१), जुनी सांगवी भाजी मंडई (प्र. ३२)
स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर.आर.आर. केंद्रांत वस्तू जमा करण्याचा उपक्रम हा पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम आहे. नागरिकांनी आपल्या घरात वापरात नसलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा करून स्वच्छ आणि सुंदर दिवाळी साजरी करावी.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
दिवाळी म्हणजे स्वच्छता, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव. वापरात नसलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात दिल्यास त्या गरजूंना उपयोगी ठरतात. या उपक्रमातून आपण शहर स्वच्छ ठेवत सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहोत. चला, एकत्र येऊन स्वच्छ, हरित आणि जबाबदार दिवाळी साजरी करूया.
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
टिप्पणी पोस्ट करा