Education :राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सर्जनशीलता झळकली!

ब्युरो टीम : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन (Creative Quotient Art Competition) या कला स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १७ शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत यश संपादन केले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना “माझे स्वप्न” आणि “एआय नाही करू शकत” असे विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आणि रंगांच्या माध्यमातून आपल्या विचारांना आकार दिला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चित्रात वेगळी दृष्टी, समाजाविषयीची जाण आणि आधुनिकतेकडे पाहण्याचा अनोखा दृष्टिकोन दिसून आला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कला विभागाचे नोडल अधिकारी श्रीकांत चौघुले यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कला शिक्षकांनी या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या कल्पकता, विचारशक्ती व आत्मविश्वासाला वाव देणे हा होता. तसेच विद्यार्थ्यांनी आणि कला शिक्षकांनी म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयातील विविध कलावस्तू, विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शने तसेच सर्जनशील प्रयोग पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी एआयचा वापर, जलचक्र, समुद्रातील जैवविविधता, महाराष्ट्रातील किनारपट्टी अशा अनेक विषयांवर माहिती घेतली. ही भेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळवत आहेत. क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन सारख्या स्पर्धा म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला मिळालेली संधी आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थी आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करायला शिकतात.

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मुंबई येथील स्पर्धा उपयुक्त ठरली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेली कलात्मक दृष्टी पाहून अभिमान वाटतो. शिक्षण विभाग नेहमीच प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यास प्राधान्य देते.

किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने