Nashik Khumbmela : कुंभमेळ्याची विकास कामे वेळेत पूर्ण होणार - विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

ब्युरो टीम : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात देत असून कुंभमेळ्यासाठीची सर्व विकास कामे विहीत वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींनी आज सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर, दिगंबर आखाडा, लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवन परिसराला भेट देत साधू - महंत यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज आदी उपस्थित होते.

डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल, असे नियोजन करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. साधू, महंतांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधू- महंतांना आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. आगामी काळात विविध विकास कामांना गती देत साधू- महंतांशी नियमितपणे संवाद साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले की, महानगरपालिकेतर्फे सोयीसुविधांसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामांना सुरूवात झाली आहे. साधू- महंतांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी दक्षता घेण्यात येईल.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू, महंतांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रवाहित राहील याची दक्षता घ्यावी, नाशिक- त्र्यंबकेश्वर प्रमाणेच कावनई येथे सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पुरेशी स्वच्छतागृहे असावीत  तसेच तपोवनात कायमस्वरूपी पोलिस चौकी कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा यावेळी साधू- महंतांनी व्यक्त केली.

यानंतर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी साधुग्रामच्या जागेची साधू, महंत यांच्यासमवेत पाहणी केली. तसेच कपिला संगम येथे भेट देत राम सृष्टीची पाहणी करीत गोदावरी नदीची आरती केली. येथे परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. साधूग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने