ब्युरो टीम: राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा