ब्युरो टीम : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने आज (५ नोव्हेंबर) केली. पथकात एसव्हीएसपी शर्मा, विशाल पांडे यांचा समावेश होता.
पथकाने विविध गावांमधील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीचा अंदाज घेतला. पथकाच्या दौऱ्यात नोंदवलेल्या नुकसानीच्या प्रकारानुसार, अनेक ठिकाणी शेतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
दौऱ्याची सुरुवात बीड तालुक्यातील लिंबा रुई येथून झाली, जिथे शेती, पीक आणि जमीन खरडून जाणे, तसेच विहिरी गाळाने भरणे अशा स्वरूपाचे नुकसान आढळले. शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी येथे पूल आणि रस्ता वाहून गेल्यामुळे दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे. कारेगाव (ता. शिरूर), घाटपिंपरी, देवळाली (ता. आष्टी)येथे देखील जमीन खरडून जाणे आणि शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली. घाटापिंप्री येथे जमीन खरडून जाण्याचे तर देवळाली येथे फळबाग नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पाहणी दौऱ्या दरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, वसीमा शेख, तहसीलदार चंद्रकांत शेळके, वैशाली पाटील, सुरेश घोळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पथकाने आज बीड, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत गावांमध्ये शेतजमिनीवरील गाळ, रस्त्यांवरील भगदाडे, नाले-ओढ्यांचे तुटलेले बांध, तसेच घरांची पडझड, विद्युत पुरवठा नुकसान आदी प्रकार पाहिले. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.
राज्यातील खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी हे पथक जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीमध्ये शेतजमीन वाहून जाणे, धरणांचे पाणी ओसंडून वाहणे, दगावलेली जनावरे, घर व रस्ते यांचे नुकसान या सर्व बाबींची माहिती सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , जिल्हा अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय पथकास सविस्तर दिली .
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान
जिल्ह्यातील ८ लाख ६ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून, आतापर्यंत ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे . अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १ ,००० पेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले, १,३१३ घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आणि ७,४७२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अहवालात नमूद आहे .सार्वजनिक मालमत्तांना देखील मोठी झळ बसली आहे. बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे, महावितरणचे खांब व वीजवाहिन्यांचे तर महामार्ग, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, अंगणवाडी व ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा या सर्वांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा