ब्युरो टीम : सार्वजनिक स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने १ नोव्हेंबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या काळात जवळपास ५८ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ६३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयानिहाय विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी देखील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासंबंधी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी बैठक घेत सार्वजनिक स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या १० दिवसांच्या काळात उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर करणे, कचरा वर्गीकरण न करणे, दुकानदारांकडे दोन डस्टबिन न ठेवणे अशा प्रकारच्या नियमभंगाविरुद्ध ५८ जणांवर कारवाई करीत दंड आकारण्यात आला.
या कारवाईत सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, वार्ड आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान काटड, रामचंद्र शिंगाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने केलेली दंडात्मक कारवाई
(आकडेवारी : १ नोव्हेंबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील)
- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर – एकूण दंड वसूल २५ हजार रुपये
- कचरा वर्गीकरण न करणे – एकूण दंड वसूल ३ हजार ५०० रुपये
- उघड्यावर कचरा टाकणे – एकूण दंड वसूल १५ हजार रुपये
- दुकानांमध्ये दोन डस्टबिन न ठेवणे – एकूण दंड वसूल १६ हजार ५०० रुपये
- सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे – एकूण दंड वसूल ३ हजार रुपये
पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल.प्रशासन आणि नागरिकांचा परस्पर सहकार्यभाव कायम राहिला, तर शहर स्वच्छतेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्वच्छतेसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा उद्देश केवळ नियमांची अंमलबजावणी करणे एवढाच नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवड शहरासाठी नागरिकांनी देखील स्वच्छतेत सहभागी होऊन महापालिकेस सहकार्य करावे.
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छतेसाठी तंत्रज्ञान, नियोजन आणि जनसहभाग यांचा संगम साधत असून, शहर स्वच्छतेत देशात अग्रेसर व्हावे यासाठी नागरिकांनी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे.
- अतुल पाटील, सहा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा