ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिका , महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५' या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारताने तब्बल सात पदकांची कमाई करत भारताचा झेंडा उंचावला तर सर्वाधिक १८ पदकांची कमाई करत कोरियाने या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या स्पर्धेत आशियातील १३ देशातील १६० हून अधिक युवा खेळाडूंनी सहभाग घेतला. लीड, बोल्डर आणि स्पीड या तीन प्रकारांमध्ये अंडर १३ आणि अंडर १५ गटातील खेळाडू मुला - मुलींनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. दक्षिण कोरियाने लीड आणि बोल्डर प्रकारात वर्चस्व राखत एकूण ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली. तर भारतीय खेळाडूंनी स्पीड प्रकारात चमकदार प्रदर्शन करत अंडर १३ मुलांच्या व मुलींच्या विभागात सर्व पदकांवर झेंडा फडकावला तसेच जपानने बोल्डर आणि लीडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच प्रमाणे महाराष्ट्र व झारखंडमधील खेळाडूंनी विशेष कामगिरी करत भारताच्या युवा गिर्यारोहण क्षमतेचा परिचय दिला.
समारोप प्रसंगी महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके म्हणाले, “पिंपरी चिंचवडमध्ये उभारलेला क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रामुळे महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील. स्पर्धेत भारताला सात पदके मिळाली यात पुण्यातील मिळीचंही समावेश आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
आयएफएससीच्या पंच पॅनल चे प्रमुख श्रीकृष्ण कडूसकर म्हणाले, आम्ही आशियाई स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकलो ही समाधानाची बाब आहे. “मिशन ऑलिंपिक २०३६” च्या दिशेने हा एक निर्णायक टप्पा ठरेल. गेली दोन दशके आम्ही महाराष्ट्रात क्लाइंबिंग संस्कृती रुजवली आहे. अण्णासाहेब मागर स्टेडियम (चिंचवड) आणि राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल (शिवाजीनगर) येथे झालेल्या यशस्वी प्रयत्नांनंतर या जागतिक दर्जाच्या कॉम्प्लेक्सपर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर होता, पिंपळे सौदागरला जागतिक स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात अशी भावना परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आम्हाला बोलून दाखवली ही पुण्याच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाची बाब आहे.
स्थानिक खेळाडूंना जागतिक व्यासपीठ
पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील मैदाने, साहित्य व वातावरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरीक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून देत आहे. यासाठी स्थानिक स्तरावर सातत्याने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहोत. यातूनच भविष्यात हेच स्थानिक खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा