या पथकात केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.
पथकाने वडकबाळ व हत्तुर (तालुका - दक्षिण सोलापूर), तिऱ्हे आणि शिवणी(तालुका - उत्तर सोलापूर) या गावांना भेट देऊन खालीलप्रमाणे नुकसानीची पाहणी केली:
वडकबाळ येथे बंधाऱ्याची स्थिती, शेतीचे झालेले नुकसान आणि वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
हत्तुर येथे रस्त्यांची अवस्था, शेतीतील नुकसानीसह जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. तिऱ्हे येथे समशानभूमी व शेतीवरील नुकसानीची माहिती घेण्यात आली. तर शिवणी येथे घरांची पडझड व जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.
यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, पिकांच्या नुकसानीसह सिंचन विहिरींच्या स्थितीची माहिती जाणून घेतली.
पथकास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वडकबाळ, हत्तुर, तिऱ्हे व शिवणी येथे झालेल्या शेती, रस्ते, वीज वितरण, शाळा व समशानभूमीच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.
या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने व सुमित शिंदे, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, व इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा