Nashik Kumbhmela 2027 : स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे - आयुक्त शेखर सिंह


ब्युरो टीम :  नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. हा कुंभमेळा स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक होण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. 3 जानेवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातून या  स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ होत असून जास्तीत जास्त नागरिक, संस्था यांनी सहभागी होवून ही  मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्त श्री. सिंह बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, क्रेडाईचे सचिव तुषार संकेलचा, जिल्हा शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद देशमुख, त्र्यंबकेश्वर शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य डॉ. एन बी  गुरूळे, राहुल देशमुख, डॉ. प्रफुल्ल कांबळे, भुजबळ नॉलेज सिटी एमईटीचे प्रा. योगेश वानखेडे, प्रा. डॉ रणवीर कोरके, संदिप फाउंडेशनचे प्रा. डॉ.सुनील महाजन, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे सचिव शंतनु देशपांडे,  स्वदेश फाउंडेशनचे बाळासाहेब माने, गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाचे प्रा. दीपक पाटील, प्रा. गणेश वाघ, जीईएस ॲण्ड आर.एच सपट कॉलेजचे  प्रा. डी.एस. चौधरी, हरित कुंभ समितीचे सदस्य संकेत मेढेकर यांच्यासह विविध महाविद्यालये, शिक्षण संथा,  विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता त्र्यंबकेश्वर शहरातून या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेत संगम घाट व गौतम तलाव परिसर, वेताळ महाराज मंदिर परिसर, आखाडा पार्किंग परिसर, निवृत्ती महाराज चौक, गौतम तलाव पूल येथे विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेत  शासकीय विभागांसह  स्वयंसेवी संस्था ,  नागरी समाज संस्था  व स्वयंसेवक गट, धार्मिक ट्रस्ट व सामाजिक संस्था, युवक व समुदाय-आधारित स्वयंसेवी संस्था, आरोग्य, पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन स्वयंसेवक, विद्यार्थी समिती, रहिवासी कल्याण संघ व स्थानिक समुदाय स्वयंसेवक, ब्रह्मगिरी/त्र्यंबक परिसराला सहकार्य करणारे साहसी व ट्रेकिंग गट या सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यापुढेही वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमांसाठी  सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून निधी उपलब्धेसाठी संस्थाचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ कुंभसाठी अशा प्रकाराच्या स्वच्छता मोहिमांचे आयोजन यापुढेही ठराविक कालावधीनुसार आयोजित केले जाणार आहेत. आपले शहर, आपला कुंभमेळा ही जाणीव मनात ठेवून मोहिमांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी व नागरिक व संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी माध्यमे व संवाद भागीदार, स्थानिक माध्यम संस्था, रेडिओ , डिजिटल प्रचार भागीदार यांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील महाविद्यालये व उद्योग संस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता व देखभालीसाठी एखादा घाट दत्तक घेतल्यास तेथे वेळोवेळी स्वच्छता राखणे सुलभ होईल. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थांची स्वच्छता जनजागरूकता रॅली, पथनाट्य यासारखे उपक्रम राबवावेत. सेवभावी संस्थांना या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना झाडून, कचरापेटी, फावडे, पाट्या, मास्क, हातमोजे, कापडी पिशव्या, टी-शर्ट, हात धुण्याचे साहित्य, सॅनिटायझर आदी स्वच्छता साहित्य उपलब्धेसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

उपस्थित सेवाभावी संस्था, महाविद्यालयांचे प्रतिनिधी, औद्योगिक संस्था प्रतिनिधी यांच्या स्वच्छता मोहिमेबाबतच्या संकल्पना व मते यावेळी जाणून घेण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने