Navi Mumbai Election : डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन

ब्युरो टीम : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही दि. 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत असून यामध्ये नवी मुंबईकर मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

सध्या डिजीटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या फेसबुक, इन्स्टा, एक्स, व्हॉट्सॲप चॅनल अशा समाज माध्यमांवरून विविध ग्राफिक्स व रिल्सव्दारे 15 जानेवारी रोजी प्रत्येक नवी मुंबईकर मतदाराने सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क कर्तव्यभावनेने बजावावा आणि संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अभिमानाने मिरवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

या सोबतच शहरात ठिकठिकाणी असलेल्या डिजीटल बॅनर्सवर मतदानाविषयीच्या आवाहनाचे ग्राफिक्स नागरिकांच्या येता – जाता दृष्टीक्षेपास पडावेत अशा प्रकारे झळकविण्यात आलेले असून मतदान करण्याविषयी प्रचार – प्रसार करण्यात येत आहे.

महानगरपालिकेचे मुख्यालय तसेच विभाग कार्यालये आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची विभागांतील कार्यालये याठिकाणी निवडणूक मतदानाविषयी सेल्फी बूथ ठेवण्यात आलेले आहेत. तसेच विविध मॉल्स, सर्व डी मार्ट, नाट्यगृह आणि वंडर्स पार्क, ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेट्रल पार्क सारखी उद्याने, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाशी – नेरूळ – ऐरोली रूग्णालये अशा वर्दळीच्या ठिकाणी सेल्फी बूथ ठेवण्यात आले आहेत.

त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणार’ या संदेशाच्या माध्यमातून नागरिक आपण मतदान करणार हा निर्धार व्यक्त करीत आहेत शिवाय इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करीत आहेत. विविध सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केलेल्या या सेल्फी बूथ सोबत नागरिकांनी आपले छायाचित्र काढावे आणि आपल्या फेसबुक, इन्स्टा, एक्स, व्हॉट्सॲप स्टेटस अशा सोशल माध्यमांवर अपलोड करावे असे आवाहन करण्यात येत आहे.  


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने