ब्युरो टीम : लोकशाहीच्या उत्सवाला साजेसा रंग, कला, ताल आणि जनसंवाद यांचा सुरेल संगम साधत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणारा हा उपक्रम स्वीप अंतर्गत उत्साहात पार पडला.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप कार्यक्रमांतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे.
या अंतर्गत चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा फ्लॅश मॉब तसेच मतदानाबाबत जनजागृती करणारे प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या सादरीकरणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात आले. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी, युवकांनी व कुटुंबांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला एल्प्रो मॉलचे केंद्र संचालक निशांत कन्सल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मतदानाची शपथ
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
मतदान प्रक्रियेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. मॉल तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी मतदान जनजागृती उपक्रम आयोजित करण्यास भर दिला जात असून मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत.
— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
लोकशाहीची खरी ताकद नागरिकांच्या जागरूक सहभागातून उभी राहते. कला, संवाद आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश अधिक परिणामकारक ठरतो आणि नागरिकांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत जाण्यास प्रेरित करतो. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीतजास्त नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत.
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

टिप्पणी पोस्ट करा