पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप अंतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज सावली निवारा केंद्रामध्ये मतदानाची शपथ व मतदान जनजागृती पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे अध्यक्ष एम. ए. हुसैन, सावली केंद्रातील व्यवस्थापक गौतम थोरात, सहव्यवस्थापक सचिन बोधनकर, समाजसेवक विष्णू गायकवाड, शाहनवाज हुसैन, अग्नेस फ्रान्सीस, काळजीवाहक अमोल भाट, राजाबाई शेळके, लक्ष्मी वायकर, उमा भंडारी, लक्ष्मी कांबळे यांच्यासह केंद्रातील लाभार्थी उपस्थित होते.
मतदान जनजागृतीबाबत पथनाट्याचे सादरीकरण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले की, 'मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे. समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत हा अधिकार आणि त्याचे महत्त्व पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सावलीसारख्या निवारा केंद्रांमधून लोकशाहीचा संदेश देणं हे अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्य आहे. निराधार असूनदेखील तुम्ही मतदानासाठी पुढाकार घेऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण कराल, अशी खात्री आहे. तुमचे मत अमूल्य असून १५ जानेवारी रोजी नक्की मतदान करा व लोकशाही बळकटीकरणासाठी हातभार लावा,' असे देखील त्यांनी सांगितले.
उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, 'सावली निवारा केंद्रातून निराधारांना केवळ निवारा देणेच नव्हे, तर त्यांना नागरिक म्हणून त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणं हे समाजासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. सावली केंद्र ही एक प्रेमाची इमारत असून येथील निराधारांचा मतदानासाठी असणारा उत्साह इतरांसाठी प्रेरणादायी आहे. लोकशाही हक्क बजावण्यासाठी सर्वांनी नक्की मतदान करावे,' असे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. ए. हुसैन यांनी करताना सावली निवारा केंद्रामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
निराधारांनी घेतली मतदानाची शपथ
'आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू' अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली आणि लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही केला. प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.

टिप्पणी पोस्ट करा