PCMC Election :प्रिय आई बाबा, पत्रास कारण की... मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम


ब्युरो टीम :
जसं तुम्ही आई–वडिलांकडे खाऊसाठी किंवा उद्यानात जाण्यासाठी हट्ट करता, तसाच हट्ट आता मतदानासाठी करा. १५ जानेवारी २०२६ रोजी आधी मतदान आणि मगच इतर कामं, असा आग्रह पालकांकडे धरा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या अनुषंगाने महापालिका हद्दीत स्वीप अंतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये ‘प्रिय आई बाबा, पत्रास कारण की...’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याची सुरुवात आज पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे उत्साहात झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी महापालिका उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड, पर्यवेक्षक मंजुषा टिळेकर, हर्षदा राऊत यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळकरी मुले त्यांच्या आई–वडिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारे एक पत्र देणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम असून, यामार्फत महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे सुमारे ५८ हजार पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे, असेही अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी सांगितले.

उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, लोकशाहीचा कणा म्हणजे मतदान आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व मतदारांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी त्यांच्या पालकांना आज एक पत्र देऊन आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. हा उपक्रम सशक्त लोकशाहीसाठी महत्त्वाचा ठरेल, असेही उपायुक्त बोदडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात “आई–बाबा, तुमचं एक मत माझं उद्याचं स्वप्न घडवेल” असा आशय असलेले पत्र अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. हे पत्र विद्यार्थी त्यांच्या आई–वडिलांना देऊन त्यांना १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड यांनी आभार मानले. थेरगाव माध्यमिक शाळेतील विद्यार्थी परमवीर आव्हाड तसेच प्राथमिक हुतात्मा चाफेकर शाळेतील विद्यार्थी तसेच सुप्रसिध्द रिल स्टार शंभू महाजन यांनी पत्राचे वाचन केले.

मतदान जनजागृती करणारे असे आहे अनोखे पत्र...

प्रिय आई बाबा, पत्रास कारण की…

    आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस लवकरच येत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या दिवशी आपण आपला मौल्यवान मताधिकार बजावणार आहोत.

     आई–बाबा, तुम्ही आम्हाला नेहमीच चांगले संस्कार, योग्य–अयोग्याची जाणीव आणि जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व शिकवले आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हेही तुम्हीच आम्हाला समजावले आहे. आज आम्हीच तुमच्याकडे एक छोटीशी विनंती घेऊन आलो आहोत.

     ती म्हणजे आपण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा. कारण तुमचे एक मत आपल्या शहराचा विकास अधिक गतिमान होण्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही मतदानासाठी बाहेर पडता, तेव्हा आम्हालाही अभिमान वाटतो की आमचे आई–बाबा जबाबदार नागरिक आहेत.

     आई–बाबा, कृपया १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि आम्हालाही लोकशाहीचे खरे महत्त्व कृतीतून शिकवा. तुमचा हा सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

तुमच्या एका मतातून आमच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागेल, याची आम्हाला खात्री आहे.

आपलाच / आपलीच नम्र 

मुलगा / मुलगी

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने