ब्युरो टीम : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाली असून आचारसंहितेचे पालन होत असल्याबाबत निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या संनियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष व त्या अंतर्गत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सुरु झाली असून त्या प्रत्येक कार्यालयासाठी पहिल्या टप्प्यात तीन आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक व व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक कार्यरत होत आहेत. यासोबतच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हिडीओ पाहणी पथकेही कार्यरत असणार आहेत.
या पथकांव्दारे मतदारांना लाच देणे, वस्तूंचे - पैशाचे – मद्याचे वाटप करणे अथवा इतर प्रलोभन दाखवणे, धाकदपटशा दाखविणे आदी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. धार्मिक वा सामाजिक तणाव, प्रतिस्पर्धांवरील विपर्यास्त टिका, प्रार्थनास्थळांचा वापर, घोषणा व जाहीराती, कार्यक्रमांचे आयोजन अशा आचारसंहिता विषयक विविध बाबींवर या पथकांचे बारीक लक्ष असणार आहे तसेच त्याचे व्हिडीओ छायाचित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या सनियंत्रणाखाली मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ. अमोल पालवे या सनियंत्रण कामात समन्वय अधिकारी असणार आहेत. तसेच परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर हे आचारसंहितेच्या विविध पथकांचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
आदर्श आचारसंहिता ही निवडणूका शांततापूर्ण व नियमबध्द आचरणात व सभ्यतेत पार पाडण्यासाठी नैतिक नियमावली असून नागरिकांचा शांततेचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. याकरिता सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत नागरिकांना काही तक्रार वा सूचना करावयाची असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1800222309 / 1800222310 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा व नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा