ब्युरो टीम : डिसेंबर महिना संपत आला असून हळूहळू हवेतील गारवाही वाढू लागला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय प्रत्येकजण करीत असतो. कोणी उबदार कपडे परिधान करते, तर कोणी शेकोटी पेटवते. थंडीच्या दिवसात घरामध्ये हिटर देखील लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पण थंडीच्या महिन्यात एक समस्या अनेकांच्या बाबतीत निर्माण होते, ती म्हणजे दात वाजणे. मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये दात का वाजतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरतर थंडीत दात वाजण्यामागे एक खास कारण असून त्याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
थंडीच्या दिवसांत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा तापमान अतिशय कमी होते आणि लोकांना थंडी वाजायला लागते तेव्हा अनेकांचे दात वाजू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, थंडीच्या दिवसांत दात वाजणे हे अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र थंडी वाजल्यानंतर दात का वाजतात, यामागेही एक कारण आहे.
म्हणून वाजतात दात
जेव्हा तुमच्या शरीराला थंडीची जाणीव होते, तेव्हा मेंदूचा हायपोथेलॅमस भाग तुमच्या शरीराला मेसेज पाठवतो की शरीराला उबेची गरज आहे. यानंतर शरीराच्या मांसपेशी वेगानं काम करू लागतात, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते. जेव्हा तुमच्या मांसपेशी वेगानं काम करीत असतात, तेव्हा शरीरात कंपने निर्माण होतात आणि यामुळे शरीर गरम होते. तसेच जेव्हा चेहऱ्यावरील मांसपेशी वेगानं चालू लागतात तेव्हा दात एकमेकांवर आपटतात. यामुळे दात वाजणे हे शरीराला एक प्रकारे ऊब देण्याचं माध्यम आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर दात वाजत असतील, तर ती सामान्य गोष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा