PCMC Election :मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून मतदान करण्याचा दिला संदेश


ब्युरो टीम  : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मतदान जनजागृती साठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने भक्ती शक्ती चौक येथे मतदान जनजागृतीसाठी एक अनोखा व प्रभावी उपक्रम राबविण्यात आला.

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनवरील टॉर्चच्या प्रकाशाच्या सहाय्याने एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारत मतदानाचा संदेश दिला. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रतिकात्मक उपक्रमातून “मतदानानेच लोकशाही उजळते” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. मतदान हा प्रत्येक पात्र नागरिकाचा मूलभूत हक्क असून, तो निर्भयपणे व जबाबदारीने बजावणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. विशेषतः युवक व प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये या उपक्रमामुळे उत्साह  दिसून आला. यावेळी फ्लॅश मॉब चे सादरीकरण देखील करण्यात आले.

तसेच लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रत्येकाचे मतदान आवश्यक आहे, या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

उपस्थितांना देण्यात आली मतदानाची शपथ

आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने