ब्युरो टीम : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर कर्मचारी अशा सुमारे दोन हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सोमवारी नंदनवन लॉन येथे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात १७ प्रभागांच्या ६८ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ३४५ केंद्र असणार आहेत. त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे यांनी सोमवारी प्रशिक्षण दिले. यात मतदान प्रक्रिया कशी असेल, ईव्हीएम कसे हाताळायचे, ईव्हीएम सील कसे करायचे याची प्रात्यक्षिक व सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणासाठी सुमारे १८०० कर्मचारी उपस्थित होते. गैरहजर कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
दरम्यान, महानगरपालिकेला मतदान प्रक्रियेसाठी ८०० कंट्रोल युनिट, १६०० बॅलेट युनिट (ईव्हीएम) उपलब्ध झाले आहेत. मेमरी कार्ड, पॉवर बँकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्याची तपासणी केली जात आहे. तसेच, मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया व ईव्हीएम हाताळून माहिती घेता यावी, यासाठी दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा