ब्युरो टीम : शिर्डी जवळील लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने कार्यान्वित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यात विकसित होत असलेल्या गावांसाठी 'आदर्श मॉडेल' ठरेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
गोगलगाव येथे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, चेअरमन नंदूशेठ राठी, व्हाईस चेअरमन सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सरपंच कल्पना मैड, दत्तात्रय राजभोज, भाऊसाहेब खाडे, अनिल विखे यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे चार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प अत्याधुनिक स्वरुपात विकसित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून, ग्रामीण भागातील हा पहिला यशस्वी प्रयोग असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, "शहर व ग्रामीण भागाची लोकसंख्या जशी वाढत आहे, तशी कचऱ्याची समस्या एक आव्हान म्हणून उभी राहणार आहे. अशा वेळी नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन हा प्रकल्प साकारला असला, तरी भविष्यात त्याला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जातील."
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकाराने नेहमीच शासनाच्या सर्व धोरणांची व योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामुळेच राज्य व देश पातळीवरील पुरस्काराने या ग्रामपंचायतीचा सन्मान झाला, ही बाब सर्वांसाठी अभिमानाची असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
लोणी बुद्रुक गावात विकसित झालेले मटण मार्केट सर्व सुविधांनी परिपूर्ण झाले असून, दोन एसटीपी (STP) प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, "या प्रकल्पामुळे कोणत्याही गावाला त्रास होणार नाही. उलट नागरिकांकडे साठणारा कचरा उचलून प्रक्रिया केंद्रावर आणण्यापर्यंत सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, कचऱ्यापासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून दिले जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा