PCMC :शहर स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिका शहर स्वच्छतेसोबतच ते आकर्षक आणि सुंदर घडवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी असणारा कचरा निर्मूलन करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणाच्या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवडचे रूप आणखी खुलत असून नागरिकांकडूनही या कामाचे कौतुक होत आहे.

“इ” क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ०५ येथील सखुबाई गवळी उद्यान परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण, तसेच “ड” क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक २९ मधील सुदर्शन चौक, पिंपळे गुरव येथील सुंदर कलात्मक बदल या उपक्रमांनी परिसराचे सौंदर्य वाढवले आहे. या दोन्ही ठिकाणी आकर्षक व सुव्यवस्थित मांडणीमुळे परिसर चैतन्यमय झाला आहे. त्यामुळे परिसर सौंदर्यीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, शांताराम माने, श्रीराम गायकवाड, प्रभारी सहाय्यक आरोग्याधिकारी अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले, शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, कोमल फर्डे, खंडेराव बैलकवाड, प्रणय चव्हाण, शैलेंद्रसिंग तंवर, गौरव गायकवाड, विकास शिरवळ आदींचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने