PCMC :पिंपरी चिंचवड महापालिकेची रात्रीची स्वच्छता मोहीम ठरतेय प्रभावी!


ब्युरो टीम :शहर अधिक स्वच्छ, आकर्षक आणि नीटनेटके दिसावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असलेली रात्रीची स्वच्छता मोहीम प्रभावी ठरत आहे. दिवसा रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच स्वच्छता अधिक कार्यक्षमतेने व्हावी, यासाठी महापालिकेकडून रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेची कामे केली जात आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेत कचरा संकलन, रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता, कडेकपारीतील घाण काढणे, धूळ-माती साफ करणे, यांसारखी विविध कामे केली जात आहेत. नव्या अत्याधुनिक वाहनांचा वापर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत यामुळे या मोहिमेचा वेग वाढला असून परिणामही स्पष्ट दिसत आहेत.

या उपक्रमांतर्गत दररोज साधारण २५ टन कचरा संकलित केला जात असून अनेक मुख्य रस्ते, व्यावसायिक भाग आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेत सुधारणा दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी रहदारी कमी असल्याने यांत्रिक झाडूने व इतर यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. नवीन उपकरणे, तैनात कर्मचारी आणि वेळेचे सुयोग्य नियोजन यामुळे ही मोहीम यशस्वी ठरत आहे.

दरम्यान, स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, आपला कचरा योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा तसेच शहर स्वच्छतेसाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने