PCMC :यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिकेत सामुदायिक कंपोस्टिंग केंद्राला उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत केली पाहणी


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिका येथे उभारण्यात आलेल्या सामुदायिक कंपोस्टिंग केंद्रास महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरात विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली शहरात स्वच्छतेविषयक विविध अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुलाब पुष्प वाटिका येथे सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र स्वर्णलता मदरसन ट्रस्ट आणि इंडियन पॉल्यूशन कंट्रोल असोसिएशन (आय.पी.सी.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत दररोज सुमारे २५० किलोपर्यंत ओल्या कचऱ्यावर एरोबिक कंपोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असून, यामुळे कचऱ्याचे स्रोतस्थळीच व्यवस्थापन होण्यास मदत मिळणार आहे. या केंद्राला उपायुक्त डॉ. ठेंगल यांनी भेट देत पाहणी केली.

उपायुक्त डॉ. ठेंगल म्हणाले की, शहरांमध्ये वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सामुदायिक पातळीवरील कंपोस्टिंग ही प्रभावी व शाश्वत उपाययोजना आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचा अधिकाधिक अवलंब करणे आवश्यक असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच शहरातील गृहनिर्माण संस्था व शैक्षणिक संस्थांनी कचरा विलगीकरण उपक्रम प्रभावीपणे राबवून जनजागृती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कलासाम्राज्य आर्ट ग्रुप यांच्या वतीने कचरा व्यवस्थापनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर आय.पी.सी.ए.चे वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी सुजित गेडाम यांनी एरोबिक कंपोस्टिंग प्रक्रियेची माहिती तसेच कचरा विलगीकरणाचे महत्त्व उपस्थितांना सविस्तरपणे समजावून सांगितले.

याप्रसंगी महापालिका प्रशासन अधिकारी सुनीता वाईकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, सुधीर वाघमारे, महेश आढाव, राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, राहुल जेठीथोर, क्षितिज रोकडे, राजेंद्र उजिनवाल, आय.पी.सी.ए.चे विभागीय व्यवस्थापक झिशान खान, सोपान इंगोले, आशिष कुंभलकर, सुजित गेडाम, मनीषा वुडीपी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने