ब्युरो टीम: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित अकराव्या राष्ट्रीय कला उत्सवाचा उद्घाटन सोहळा यशदा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक राहूल रेखावार, एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी व शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते. एनसीईआरटी, नवी दिल्लीद्वारे या उत्सवाचे २०१५ पासून दरवर्षी आयोजन केले जाते.
यावेळी बोलताना केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील म्हणाले की, भारतीय कला व संस्कृती वैविध्यपूर्ण आणि सुंदर असल्यामुळेच आपला देश देखील खूप प्रगल्भ आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही विकसित भारताचे स्वप्न साकार करणार आहात. या विकसित भारताच्या स्वप्नात कला क्षेत्राची भूमिका फार महत्वाची असणार आहे. २०२५ मध्ये या उत्सवाचे दोन अध्याय पार पडले. जानेवारी २०२५ ला भोपाळमध्ये आणि आता पुण्यामध्ये म्हणून हा उत्सव खास होणार आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात याच भूमीतून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला होता. याच भूमीमध्ये आज तुम्ही देशभरातून सर्व विद्यार्थी कला उत्सवासाठी दाखल झाला आहात ही खूप प्रेरणादायी बाब आहे.
देशभरातून येथे विद्यार्थी कला सादर करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे भारतभराचे कलाविश्व याठिकाणी अवतरल्यासारखे वाटत आहे. स्पर्धा कशीही होवो परंतु येथून प्रत्येक विद्यार्थी कलेची देवाणघेवाण करून जाणार जाणार असल्याची भावना शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल यांनी व्यक्त केली.
हा कला उत्सव सर्व विद्यार्थ्यांसाठो अविस्मरणीय होणार आहे. कोणत्याही खेळात, कलेत सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मेहनत करा आणि यशस्वी व्हा. असा मूलमंत्र शिक्षण आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. तर कला राष्ट्राला राष्ट्रांशी जोडते आणि संस्कारित जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला प्रेरित करते. कला ही भारताच्या कणाकणात वसलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील कलेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी हा कला उत्सव मोलाची भूमिका पार पाडणार असल्याचे मत एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद संकलानी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील पुणे हे शहर शैक्षनिक,कला आणि भक्तीचे वारसदार आहे. त्यामुळे या ठिकाणी हा कलाउत्सव पार पडतोय याचा मला आनंद होतोय अस म्हणत यंदाचा हा अकरावा कलाउत्सव खूप खास होणार असल्याचे एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख, प्रा. ज्योत्स्ना तिवारी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात या उत्सवामध्ये एकूण विविध राज्यातील ७३१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या या अकराव्या कला उत्सवासाठी आसाम लक्षद्वीप अशा देशभराच्या कानाकोपऱ्यातून ८०० हून अधिक विद्यार्थी पुण्यात दाखल झाल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय कला उत्सवाच्या दहा वर्षाच्या वाटचालीची चित्रफित (शॉर्ट फिल्म) देखील दाखवण्यात आली. यामध्ये दहा वर्षांमध्ये कार्यक्रमात होत गेलेले बदल आणि नव्याने जोडल्या गेलेल्या कलांची माहिती देण्यात आली.
उद्घाटनानंतर प्रतिभा ज्युनियर कॉलेज पिंपरी यांचे महाराष्ट्राची कलासंस्कृती दर्शवणारे दमदार नृत्य सादरीकरण झाले आणि या उत्सवाला सुरुवात झाली . या उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण विशेष विद्यार्थ्यांना देखील पाहता यावे यासाठी तेजल पटवारी आणि श्रुती अवाले यांनी सांकेतिक भाषेद्वारे (साईन लँग्वेज) इंटरप्रिटेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधू जयस्वाल आणि विकास कोकाटे यांनी केले तर एससीईआरटीचे संचालक राहूल रेखावार यांनी आभार मानले.
यंदाचा हा कला उत्सव महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने तसेच श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे संपन्न होत आहे. यासोबतच भारत सरकारचे २०० शैक्षणिक चॅनल आहेत. त्यातील इ विद्या चॅनल नंबर ३३ वर या कला उत्सवाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा