ब्युरो टीम : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्हा परिसरात अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण रु. ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. दि. १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर कारवाई करून २०० गुन्हे नोंद करण्यात आले असून २२५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २४ वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वार्षिक आकडेवारी
०१ एप्रिल २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत विभागाने २३०९ गुन्हे दाखल करून २२३४ आरोपींवर कारवाई केली. यात २४८ वाहनांसह रु. ०८ कोटी ७४ लाख ९० हजार २८१ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत (१९०१ गुन्हे, १५८१ आरोपी, २३७ वाहनांसह रु. ०६ कोटी ७३ लाख २१ हजार २६६ मुद्देमाल) यावर्षी गुन्हाअन्वेषणात २९.९५ टक्के वाढ झाली आहे. तसेच विभागाने अवैध मद्य विक्रीस परवानगी देणाऱ्या ४१७ ढाब्यांवर गुन्हे नोंदवून ६६९ आरोपींवर कारवाई केली आहे.
विशेष कारवाई (३१ डिसेंबर २०२५)
निरीक्षक भरारी पथक क्र.१ यांनी मौजे हिवरे, ता. मोहोळ येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेला १५३ ब.लि. विदेशी मद्यसाठा, २७ ब.लि. देशी मद्यसाठा व बनावट बूचेसह रु. २ लाख ३ हजार २५० चा मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक ब विभागाने होटगी रोड, सोलापूर येथे बनावट विदेशी मद्य वाहतूक करणारे १ मोटरसायकलसह रु. १ लाख ४० हजार ३८५ चा मुद्देमाल जप्त केला.
जप्त मद्य दुय्यम दर्जाचे असून त्याची तीव्रता नियमित मद्याहून ८ टक्के कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संयुक्त कारवाई व विशेष पथके
या कारवाईत पोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादींसोबत संयुक्त कारवाईवर भर देण्यात आला असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
सहभागी अधिकारी व कर्मचारी
उप अधीक्षक जे. एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चवरे, ए.व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, श्री. सचिन भवड, दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण तसेच जवान व महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख, दिपक वाघमारे आदींनी ही कारवाई पार पाडली.
आवाहन
अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा