Sindhudurg :'सिंधुदुर्गनगरी' महसूली गावाची निर्मिती, जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना

ब्युरो टीम : मौजे ओरोस बुद्रुक (134-12-80 हे.आर.), मौजे अणाव (95-47-70 हे.आर) आणि मौजे रानबांबुळी (104-59-70 हे.आर) असे एकूण 334-20-20 हे.आर. क्षेत्र संपादीत करुन ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ ची निर्मिती दिनांक 2 एप्रिल 1998 रोजी झालेली आहे. उपरोक्त क्षेत्रापैकी  सर्व क्षेत्राचा ताबा ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ यांचेकडे आहे. त्याच क्षेत्राचा समावेश असणारे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव निर्माण करत असलेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून झालेली आहे. त्यामुळे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव दिनांक 1 जानेवारी 2026 पासून अस्तित्वात आलेले आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसूली गावांची संख्या 759 इतकी झालेली आहे. याबाबतची अंतीम अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. 

नवीन महसूली गाव निर्माण करताना प्राधिकरणाच्या प्रत्यक्ष ताब्यात असणाऱ्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन क्षेत्राचा समावेश  सदरच्या महसूली गावाच्या क्षेत्रात करण्यात आलेला नाही. तसेच मौजे रानबांबुळी येथील 77-31 हे.आर क्षेत्र जे संपादनाकरिता प्रस्तावित होते, परंतु त्याचे भूसंपादन करण्यात आलेले नव्हते ते क्षेत्र देखील मौजे रानबांबुळी याच गावात राहणार असून संदर्भिय क्षेत्र सद्यस्थितीत ‘सिंधुदुर्गनगरी’ या नवनिर्मित महसूली गावात समाविष्ट करणेत आलेले नाही.

‘सिंधुदुर्गनगरी’ महसूली गाव निर्मिती आणि प्रस्तावित त्याच क्षेत्रातील सिंधुदुर्गनगरी नगरपरिषद निर्मिती या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया आहेत. ‘सिंधुदुर्गनगरी’ महसूली गाव निर्माण झाल्यामुळे  मुळ इतर 3 गावे 1. मौजे ओरोस बुद्रुक, 2.मौजे अणाव 3. मौजे रानबांबुळी तसेच त्यालगत असणारी इतर गावे यांच्या क्षेत्रात कोणताही बदल होणार  नाही. 

मौजे ओरोस बुद्रुक, मौजे अणाव आणि मौजे रानबांबुळी या गावातील एकूण 3 (38ब, 267ब, 1ब ) या सर्वे नंबरचा  समावेश करुन ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव निर्माण होत असल्याने प्राधिकरण क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या लोकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या दाखल्यांच्या वितरण प्रक्रियेत सहजता येणार असून त्याचा फायदा प्राधिकरण क्षेत्रात राहणाऱ्या जनतेला होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने