विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे
अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदाची संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना प्रेरणा मानणाऱ्या पक्षाने धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश दिला आहे. ही निवड केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.
शारदा दिगंबर ढवण या दिवंगत दिगंबर ढवण यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिगंबर ढवण यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उतरून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवण यांना मिळालेला जनसमर्थनाचा पाया आज गटनेतेपदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते.
अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णयक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.
पहा व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा