ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी विभागातील सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांना थकबाकीदारांवर कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या बैठकीस शहरातील १८ विभागीय कार्यालयांतील सहाय्यक मंडल अधिकारी उपस्थित होते.
मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत थकबाकीदारांना जप्ती अधिपत्रे बजावण्यात येणार आहेत. अधिपत्र बजावल्यानंतरही जर संबंधित मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही, तर त्यांच्या मालमत्तांवर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेंतर्गत निवासी थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडित करणे तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर थेट जप्ती अशी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
३५ मालमत्ता जप्त तर १३३ नळ कनेक्शन खंडित
पिंपरी चिंचवड महापालिकेने कर संकलन मोहिमेला गती दिली असून, या कारवाईसाठी १८ विभागीय कार्यालयांतील सर्व गटप्रमुखांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरातील ३५ मालमत्तांची जप्ती करण्यात आली असून, १३३ थकबाकी मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.
थकबाकीदारांची यादी केली जाणार प्रसिद्ध
ज्या थकबाकीदारांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, अशा सर्व थकबाकीदारांची यादी महापालिकेमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित थकबाकीदारांकडून याबाबत करण्यात येणारी कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. या कराच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व शिक्षण व्यवस्था सक्षमपणे राबवली जाते. वारंवार सूचना व नोटिसा देऊनही मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर नियमान्वये कारवाई करण्यात येईल.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
मालमत्ता कर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात असून, थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्यासारखी कारवाई टाळता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
– पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी–चिंचवड महापालिका
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा