Amravati :मेळघाट आरोग्य परिक्रमेत डॉक्टरांनी सक्रीय सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी आशिष येरेकर


ब्युरो टीम: मेळघाटातील महिला व बालकांच्या आरोग्यासाठी मेळघाट परिक्रमा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिन्यातील एक दिवस या भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी डॉक्टरांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम बैठकीत सामाजिक आणि आरोग्यविषयक आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह शहरातील वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येरेकर यांनी मेळघाटातील आरोग्यविषयक प्रश्नांची माहिती दिली. याठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे माता व बाल मृत्यू नियंत्रणात आहे. मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महिला व बालकांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने महिला व बालरोग तज्ज्ञ शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. यात त्यांच्या आरोग्याची तपासणी होऊन त्यांच्या आजाराचे निदान होऊ शकेल. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या कमी होतील. आरोग्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच महिला आणि बालकांना पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी डॉ. आशिष सातव यांनी सूचविलेल्या उपायांवर कृषि विज्ञान केंद्राकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.  यासाठी एकात्मिक बाल विकास विभागाचे सहकार्य करण्यात येणार आहे.

यासोबतच 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या किडणीची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने किडणीचे आजार आढळणाऱ्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. रक्तसंसर्गासाठी उपाययोजना करण्यात येणार असून कुपोषण निवारणासाठी ग्राम समितीची महिन्यातून एकदा सभा घेण्यात येणार आहे. मेळघाटातील आरोग्य सुधारावे, यासाठी जीवनसत्वयुक्त आहाराचा समावेश करण्यावर भर देण्यात येणार आहे. आरोग्यासह नागरिकांचे जीवनमान सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी दुध उत्पादन वाढवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यासाठी दोन शितवाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोहफुलांमधून उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मोहफुल वेचण्यासाठी नेट आणि सुकविण्यासाठी ड्रायर देण्यात येणार आहे. तसेच प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना संपर्कात व्यत्यय येऊ नये, यासाठी वीज आणि मोबाईल नेटवर्क सुरळीत चालू राहिल, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येरेकर यांनी केल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने