PCMC Election : :'पीसीएमसी'चे दुर्गादेवी टेकडीवर ‘वॉकेथॉन फॉर मतदान’, 'ही' अभिनेत्री येणार



ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती उपक्रम (स्वीप) अंतर्गत निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ हा विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जनजागृती उपक्रमास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती लाभणार आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, तसेच नागरिकांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली विविध स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे वॉकेथॉन फॉर मतदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

वॉकेथॉन फॉर मतदान या कार्यक्रमास सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा सर्वात प्रभावी मार्ग असून, प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा आहे, असा संदेश या वॉकेथॉनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे तसेच निर्भय व निष्पक्ष मतदानाचा संदेश देणे हा उद्देश आहे.

लोकशाही मजबूत राहण्यासाठी मतदान प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. ‘वॉकेथॉन फॉर मतदान’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदान ही केवळ हक्काची नव्हे तर जबाबदारीची बाब आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. विशेषतः तरुण पिढी आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी अशा नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

-श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने