PCMC Election : मतदानासाठी मतदान ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या १४ जुलै २०२५ च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली आहे. 

मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे अन्य १२ प्रकारचे पुरावे

१) भारताचा पासपोर्ट

२) आधार ओळखपत्र

३) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

४) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)

५) केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसह दिलेली ओळखपत्रे

६) राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असलेले पासबूक

७) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसह अपंगत्वाचा दाखला

८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)

९) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.)

१०) लोकसभा/राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

११) स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र

१२) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसह कार्ड

लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करताना प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे. ज्यांच्याकडे सदर ओळखपत्र नसेल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदारांनी आवश्यक ओळखपत्रे सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र उपलब्ध नाही, त्यांनी आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक वैध ओळखीचा पुरावा मतदान केंद्रावर सादर करून मतदानाचा हक्क बजावावा.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने