ब्युरो टीम : राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी शासनाने दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीचे शासन परिपत्रक निर्गमित करुन आदेशित केलेले आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठया प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना मालकांनी, व्यवस्थापनाने सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करुन मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कार्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन अपर कामगार आयुक्त, नागपूर कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
कामगारांना काही तक्रार असल्यास त्यांनी अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.2, 4 था माळा, ए-विंग, जिल्हा परिषद जवळ, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 येथे स्थापित केलेल्या दक्षता कक्षात प्रत्यक्षात किंवा दुरध्वनी क्रमांकावर 0712-2980273, 2980275 किंवा ई-मेलव्दारे-adclngp@gmail.com संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा