Pune Grand Tour :‘बजाज पुणे ग्रँड टूर’ च्या माध्यमातून पुण्याचा इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी


ब्युरो टीम : बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य जगासमोर आणण्यासोबतच पुण्याचा इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या टप्पा-३ मधील स्पर्धा मार्गाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार संजय जगताप, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव सचिन यादव, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पुरंदरच्या वर्षा लांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी बारामती तालुक्यात क्रीडा संकुल, ग्रामपंचायत कार्यालय मोरगाव आणि सासवड येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे नगसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, मुख्याध्यापक, विविध  संघटनेचे पदाधिकारी आदींना मार्गदर्शन केले.

डुडी म्हणाले ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार असून याद्वारे आपली गावे, परिसर देश विदेशात पोहचणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गाव व परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोहोचविण्याची संधी आहे. याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. 

प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील, यादृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेवून सूक्ष्म नियोजन करावे, प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आदी घटकांनी मिळून मोहिमस्तरावर स्वच्छता मोहिम राबवावी, असे आवाहन डुडी यांनी केले.

ते पुढे म्हणाले, या स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्यात आले आहेत, या रस्त्याद्वारे दुर्गम भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण भागात गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे. 

पुण्याला 'सायकलीचे शहर' म्हणून ओळखले जायचे तीच ओळख पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आहे, त्याचबरोबर नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीच्यादृष्टीने सायकलीचा वापर त्यामाध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल.

या टप्पाअंतर्गंत येणाऱ्या गावात स्वयंशिस्त पाळत स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभुषा, नाटक, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे खेळाडूंचे स्वागत करावे तसेच उत्साह वाढवावा. असे करताना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन डुडी यांनी केले.

नगराध्यक्ष सातव म्हणाले, 'टूर डे फ्रान्स' च्या धर्तीवर जिल्ह्यात 'बजाज पुणे ग्रँड टूर’ही आंतराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार असून त्यातील तिसरा टप्पा बारामती येथे होणार आहे, ती आपल्यासाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धा यशस्वी करण्याकरिता  बारामतीकरांच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

नावडकर म्हणाले, स्पर्धा मार्गावर येणाऱ्या गावांतील नागरिकासोबत प्रशासनाच्यावतीने बैठक घेऊन सुक्ष्म नियोजन करण्यासोबतच स्पर्धा पाहण्याकरिता विविध खेळाडू, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी, गणेश मंडळ, योगा गटाचे सदस्य तसेच सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.या वेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सासवडचे राजेंद्रसिंह  गौर, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे, सासवडचे विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

२२ जानेवारी रोजी आयोजित स्पर्धेचा टप्पा-३ चा मार्ग

सासवड येथील चंदन टेकडी येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव क.प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी आणि विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने