Tata Motors PCMC :उद्योगनगरीत लोकशाहीचा उत्सव, टाटा मोटर्समध्ये हजारो कामगार बंधू-भगिनींनी घेतली मतदानाची शपथ


ब्युरो टीम : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीचा उपयोग सर्वप्रथम मतदानासाठी करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वीप (SVEEP) अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत आज पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये भव्य मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.

भारतरत्न जे. आर. डी. टाटा व रतन टाटा यांना अभिवादन करून सुरू करण्यात आलेल्या या मतदान शपथ कार्यक्रमात टाटा मोटर्स कंपनीतील अधिकाऱ्यांसह सुमारे ३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतदानाची शपथ घेत उत्स्फूर्तपणे लोकशाही उत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचा व १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह टाटा मोटर्सचे व्यवस्थापन अधिकारी आनंद लपारकर, आनंद आगाशे, डॉ. संतोष जाधव, अतुल आहिर, नितीन कदम तसेच कंपनीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेकडो एकर परिसरात विस्तारलेली व वीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली टाटा मोटर्स ही औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असून, अशा मोठ्या औद्योगिक संस्थेत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णा बोदडे यांनी मानले.

आजचा कार्यक्रम हा नागरिकांच्या मनात मतदानाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता,लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी दिली.

फ्लॅश मॉब व पथनाट्याने जिंकली उपस्थितांची मने

मतदान जनजागृतीसाठी यावेळी लहान मुलांकडून सादर करण्यात आलेल्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणाचे कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून कौतुक करत मुलांना छोटी भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. याचबरोबर मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्यातून नागरिकांनी मतदान का करावे, याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

पहा व्हिडिओ : फ्लॅश मॉब 

मतदान शपथ

"आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू "अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.

टाटा मोटर्ससारख्या मोठ्या औद्योगिक संस्थेत घेतलेला मतदान शपथ कार्यक्रम हा संपूर्ण शहराला लोकशाही सहभागाचा संदेश देणारा ठरला आहे. सुदृढ, सक्षम आणि उत्तरदायी लोकशाहीसाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही केवळ जबाबदारी नसून ती लोकशाहीप्रतीची कर्तव्यभावना आहे.

 — अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पहा व्हिडिओ : मतदान शपथ 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने