Shirdi :शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई


विक्रम बनकर, अहिल्यानगर : शिर्डी साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १५२ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी निर्गमित केले आहेत.

शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर व शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावर भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवली जातात. भाविकांना खासगी पार्किंगच्या ठिकाणी वाहने घेण्याचा आग्रह धरला जातो. तसेच विशिष्ट दुकानांतून अव्वाच्या सव्वा दरात पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातून भाविकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा भाविकांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही गावातून शिर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांनी विशिष्ट दुकान अथवा आस्थापनेतूनच खरेदी करावी किंवा निवास करावा, असा आग्रह आता धरता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थीचे व्यवहार करणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपली बाजू मांडता येईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने