International Film festival :आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा - महापौर रवि लांडगे


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार असून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. 

या माध्यमातून शहरातील कलाकार घडतील व शहराची सांस्कृतिक जडणघडण होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने 'पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६' चे आयोजन ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेता क्षितिज दाते, मुख्यमंत्री सहाय्यक शुभम सातकर, चित्रपट निर्माते विजय चौधरी, फिल्म सिटी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, विजय गुंड, डी. वाय. पाटील फेडरेशनचे विद्यानंद मानकर, मच्छिंद्र धुमाळ, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड, अभिषेक अवचार, डॉ. विश्वास शेंबेकर, जय भोसले, पूजा गुंड, श्रुती शेंबेकर यांच्यासह चित्रपट रसिक उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, 'मी स्वतः कलारसिक आहे. मला चित्रपट पाहण्याचा छंद आहे. मी स्थानिक भाषेपासून विविध भाषेतील चित्रपट पाहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील देखील चित्रपट मी पाहत असतो. चित्रपटामध्ये आपण स्वतःला पाहत असतो. आपलेच एक कथानक रुपेरी पडद्यावर पाहताना आपण चित्रपटाशी समरस होत जातो. चित्रपट ताणतणाव घालवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी चित्रपट हे माध्यम खूप उपयुक्त आहे. या माध्यमातून सकारात्मक जीवन घडवण्यासाठी मदत होत असते. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चित्रपटासारख्या कलाकृती पाहिल्यामुळे जीवनात एक सकारात्मक बदल घडत असतो, असे देखील महापौर रवि लांडगे म्हणाले.

महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहावी यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य-दिव्य स्वरूपात आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. येत्या काळात शहराची सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत राहील, असे देखील त्यांनी सांगितले.

महापौर रवि लांडगे यांनी यावेळी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा चित्रपट सृष्टीतील संघर्षमय प्रवास सांगतानाच अपयशाला खचून न जाता वाटचाल सुरू ठेवल्यास यश नक्की मिळते, असा संदेश दिला.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात चित्रपट सृष्टीचा एकप्रकारे पाया रचला. आज भारतीय चित्रपटांनी जगाच्या पाठीवर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. चित्रपट हा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. प्रत्येक क्षेत्रातील माणूस घडवण्यासाठी चित्रपट हे माध्यम नक्कीच उपयुक्त आहे. चित्रपट पाहताना आपण त्यामध्ये समरस होतो. चित्रपट महोत्सवामध्ये रसिकांना देशविदेशातील दर्जेदार कलाकृती विनामूल्य पाहता येणार आहेत. रसिकांनी यात सहभागी होऊन कलासंस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आपल्या शहरात होत आहे, याचा सर्वच शहरवासीयांना अभिमान व आनंद आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध देशातील चित्रपट पाहण्याची संधी शहरातील चित्रपट रसिकांना मिळत आहे. पुढील दोन दिवस हा महोत्सव चालणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, 'पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तर गेल्या काही वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पाहता पिंपरी चिंचवड आता महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. एखाद्या शहरातील दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक, साहित्यिक हे त्या शहराची खरी ओळख असतात. या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक कलाकारांना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध होत आहे. अशा महोत्सवाला भविष्यात जास्तीत जास्त पाठबळ देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, जेणेकरून चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी रसिकांची रांग लागेल, असे देखील ते म्हणाले.

स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील कला रसिकांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा महोत्सवाला रसिक आवड म्हणून येत असतात. तसेच विविध क्षेत्रातील रसिकांची निवड करून त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. कला रसिक घडवण्यासाठी या महोत्सवात सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिका सूक्ष्म नियोजन करीत आहे. पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून तो शहराची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर नेणार आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे,' असे देखील त्यांनी सांगितले.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे म्हणाले की, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक नागरिकाचा आत्मा आहे. आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असून ही सर्व शहरवासीयांना अभिमानास्पद बाब आहे. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. या माध्यमातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. वेगवेगळ्या देशातील चित्रपट हे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मिळत असते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले की, 'पिंपरी चिंचवड शहर कलाकार घडण्यासाठी पोषक असून नागरिकांनी देखील रसिकतेने अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसारख्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे. चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते प्रबोधनाचे एक माध्यम आहे. या माध्यमात प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती घडवण्याची क्षमता आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असल्याने येथे वेगवेगळ्या देशातील कलाकार चित्रपट बनवताना कशाप्रकारे विचार करतात, हे देखील आपल्याला कळणार आहे. खरंतर चित्रपट क्षेत्रात करिअर चांगल्या प्रकारे होऊ शकते. परंतु त्यासाठी या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेऊन त्यामध्ये पदार्पण करणे गरजेचे आहे,' असेही ते म्हणाले.

अभिनेते क्षितिज दाते यांनी सांगितले की, चित्रपट महोत्सव, नाट्यमहोत्सव यामध्ये कलात्मक प्रयोग, नाविन्यपूर्ण गोष्टी पाहण्याची संधी रसिकांना मिळत असते. एक व्यक्ती घडण्यासाठी हे खूप उपयोगी असते. आज पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे आपल्या शहराला एक वेगळी सांस्कृतिक ओळख करून देणार आहे. या महोत्सवाला रसिक भरभरून प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत डॉ. विश्वास शेंबेकर यांनी तर प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चैतन्य कुलकर्णी यांनी केले, तर आभार महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.

शिवांजली डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या कथक नृत्यातून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने