Kolhapur : कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

ब्युरो टीम : कोल्हापूर जिल्ह्यात आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांत पसरलेल्या चुकीच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली आहे. या 'पॅनिक बायिंग'मुळे कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे पंपांवरील व्यवस्थापनावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर आवश्यक तेवढा बफर स्टॉक उपलब्ध असून संपूर्ण पुरवठा साखळी नियमितपणे कार्यरत आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशी कोणतीही परिस्थिती नसून कोल्हापुरात दिसलेली गर्दी ही केवळ अफवांमुळे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध कारणांमुळे बंद असणाऱ्या ४ ते ५ टक्के पेट्रोल पंपांचा इंधन कमतरतेशी कोणताही संबंध नसून, पुरवठा नियमित सुरू आहे. बीपीसीएलच्या जिल्ह्यातील ११९ पंपांवरून होणारी दैनंदिन विक्री काल ३०० किलोलीटर पेट्रोल आणि ३२० किलोलीटर डिझेलपर्यंत पोहोचली आहे, जी सरासरीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

इंधनासोबतच एलपीजी गॅसचा पुरवठा देखील निर्धारित कालावधीत केला जात असून नागरिकांनी केवळ गरजेनुसारच गॅस बुकिंग करावे आणि अफवांकडे दुर्लक्ष करावे, असेही प्रशासनाने सूचित केले आहे. नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून विनाकारण गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच इंधन किंवा गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी ०२३१-२६५५५७९ या क्रमांकावर किंवा ८३९०७३२०२६ या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने