PCMC :महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापनात प्रभावी कामगिरी


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा येथील ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत आहे. या उपक्रमांतर्गत १ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२६ या काळात तब्बल ९१६ टन कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे. 

महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,  सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली दापोडी व गवळीमाथा येथे राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार या उपक्रमांतर्गत  १ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत जवळपास ९१६ टन कचरा संकलन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ६२०.३८ किलो सुका कचरा, ३.२९ टन ओला कचरा, तसेच २८०.५० किलो सॅनिटरी कचरा संकलित करण्यात आला आहे. याशिवाय ११.९५ किलो घातक घरगुती कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे.

गेल्या २४ दिवसात दापोडी तसेच गवळीमाथा येथील महिन्याभरात तब्बल ९ हजार ९९४ घरांपर्यंत ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे कचरा विलगीकरण, संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या उपक्रमांतर्गत कचऱ्याचे स्रोतावरच विलगीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती यावर विशेष भर दिला जात असून, वसुंधरापूरक आणि स्वच्छ शहराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

नागरिकांनी आपला घरगुती कचरा हा ओला, सुका कचरा, घरगुती घातक, सॅनिटरी कचरा वेगळा देऊन आणि कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

दापोडी व गवळीमाथा ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल होत असून, हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरत आहे.  

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

कचरा व्यवस्थापनात शाश्वत पद्धतीचा अवलंब करण्यासाठी ‘झिरो वेस्ट स्लम’ ही संकल्पना प्रभावी ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने