PCMC : जनगणना प्रशिक्षण मोहिम लवकरच होणार सुरू, प्रशिक्षण पूर्ण


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी ( फील्ड ट्रेनर्स) यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण मोहिमेचा यशस्वी समारोप करण्यात आला. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत शहरातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर ही सत्रे पार पडली.

या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले मास्टर ट्रेनर उपायुक्त पंकज पाटील, उपायुक्त अण्णा बोदडे, नायब तहसीलदार स्वाती नरूटे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करत प्रशिक्षणार्थींना जनगणनेच्या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती दिली.

या प्रशिक्षण सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेची उद्दिष्टे, घरगुती सर्वेक्षण करण्याची अचूक पद्धत, माहिती संकलन करताना घ्यावयाची काळजी, तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र यांचा समावेश होता. यासोबतच डिजिटल साधनांचा वापर करून माहिती नोंदविण्याची पद्धत, ॲप आधारित डेटा एन्ट्री, तसेच माहितीची पडताळणी आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक बाबींचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष सराव (प्रॅक्टिकल) सत्रांवर विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींची कल्पना आली आणि त्यावर उपाययोजना समजून घेता आल्या. तसेच विविध उदाहरणांच्या माध्यमातून डेटा संकलनातील अचूकता आणि पारदर्शकता कशी राखावी याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे क्षेत्रीय प्रशिक्षक अधिक आत्मविश्वासाने व सक्षमपणे काम करण्यास सज्ज झाले आहेत. आगामी जनगणना प्रक्रियेत अचूक, विश्वासार्ह आणि वेळेत माहिती संकलित करण्यासाठी हे प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली अचूक लोकसंख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवण्यात येणार असून, या टप्प्यात घरगुती सर्वेक्षणाद्वारे शहरातील प्रत्येक कुटुंबाची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, शिक्षण, व्यवसाय, निवासस्थिती तसेच इतर आवश्यक सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश असेल. या सर्वेक्षणामुळे शहराची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक रचना समजून घेण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया सुरू केली जाईल, ज्यामध्ये संकलित माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणी केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यावर महापालिकेचा भर आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

अचूक आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि विश्वासार्ह होणार आहे. या प्रशिक्षणामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना आवश्यक कौशल्ये, तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वास मिळेल. डिजिटल साधनांचा योग्य वापर, नागरिकांशी प्रभावी संवाद आणि माहिती संकलनातील अचूकता यामुळे संपूर्ण जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होईल. भविष्यातील शहर नियोजनासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सचिन पवार,  उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने