विक्रम बनकर, अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभाला तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नेते, पदाधिकारी, महिला, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शाखेच्या उद्घाटनामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कार्याचा गौरव केला. संस्थापक गावडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने सभासदांचे हित जपत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले. पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभारामुळेच संस्थेकडे ३०० कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या असून, ही बाब संस्थेवरील लोकांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. महेश्वर मल्टीस्टेटची आणखी प्रगती होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाजाभिमुख कार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नवीन शाखेची पाहणी केली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पहा व्हिडीओ

टिप्पणी पोस्ट करा