पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या नागरिकांकडून २१२ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा डिजिटल माध्यमातून करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून कर भरण्याचे प्रमाण वाढत आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाचे कर देयक वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक,पर्यावरणपूरक निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. विशेषतः ऑनलाइन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक डिजिटल पद्धतीचा वापर करत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून महापालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. ऑनलाइन कर भरणा आणि विविध सवलतींना मिळणारा प्रतिसाद नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दर्शवितो. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी सेवांच्या बळकटीसाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा तसेच पुढील कारवाई टाळावी.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला असून, दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी कर भरला आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास प्राधान्य दिले असून, त्यातून १० टक्के सवलतीचाही लाभ घेतला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेत प्रत्यक्ष येण्याऐवजी सुरक्षित आणि सुलभ ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरून वेळ, श्रम आणि गर्दी टाळावी. उर्वरित मालमत्ताधारकांपर्यंतही लवकरच देयके पोहोचविली जातील.
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पहा व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा