ब्युरो टीम : ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, ठाणे-पालघरसह विविध विधानपरिषद मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा हा राज्यातील जनतेचा महायुतीवरील वाढता विश्वास दर्शवणारा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांसह महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे-पालघर मतदारसंघाची बिनविरोध निवडीची परंपरा असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, यापूर्वीही दिवंगत वसंत डावखरे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले होते. निवडणूक झाली असती तरी महायुतीकडे स्पष्ट बहुमत होते; मात्र सर्वांनी एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे ठाण्याची राजकीय परंपरा कायम राहिली आहे.
महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर मतभेद आणि गटबाजी उघड झाल्याचे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची कमकुवत स्थिती स्पष्ट झाली असल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि आता विधान परिषद निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आल्याचा दावा त्यांनी केला.
महायुतीतील समन्वयाचे उदाहरण देताना शिंदे म्हणाले की, रायगडमध्ये आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला. पुण्यातही महायुतीतील समन्वयामुळे एक उमेदवार माघार घेण्यात यश आले. संभाजीनगरसह विविध ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी पक्षहितासाठी माघार घेतल्याने महायुतीमध्ये उत्तम समन्वय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नाशिक आणि जळगाव विधान परिषद मतदारसंघांमध्येही सकारात्मक चर्चा सुरू असून तेथेदेखील सर्वानुमते निर्णय होण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अर्ज भरण्याच्या वेळी व्यक्त केलेला महायुतीच्या १७ जागांच्या विजयाचा विश्वास आता अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात २०२२ पासून महायुती सरकारने विकासाला गती दिली असून केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सातत्याने पाठबळ मिळत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात राबविलेल्या विकासकामांचा आणि प्रकल्पांचा सकारात्मक परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असून महायुती सरकार शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील विकासकामांचा वेग मंदावला होता. ते सरकार स्थगिती सरकार होते, त्यांचा पाय नेहमी ब्रेकवर होता; तर महायुती सरकारचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने धावत असून राज्यात पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांना गती मिळाली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी क्लस्टर पुनर्विकास योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ही देशातील सर्वात मोठी आणि परिवर्तन घडविणारी योजना आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज रस्ते, उद्याने, शाळा, रुग्णालये, जॉगिंग ट्रॅक आणि सर्व नागरी सुविधा नागरिकांना या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिका आणि सिडको यांच्या माध्यमातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मान्सूनपूर्व तयारीबाबत बोलताना त्यांनी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांच्या कामकाजाचा सातत्याने आढावा घेतला जात असून प्रत्येक मंत्र्याने आपल्या खात्याला न्याय देत मतदारसंघातही प्रभावी काम करणे अपेक्षित आहे. सरकारने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणे हे प्रत्येक मंत्र्याचे कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, यापूर्वी त्यांच्या पत्नीही महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. आता स्वतः रवींद्र फाटक विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आले असून हा एक सुखद योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे जात आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवनमान उंचावले असून सुमारे ३२ कोटी नागरिक गरिबीरेषेच्या वर आले असल्याचा दावा त्यांनी केला. महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे देश सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
विकसित भारत २०४७चे स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास व्यक्त करताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. महायुती सरकार विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या बळावर आगामी सर्व निवडणुकांमध्ये यश संपादन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख आणि उपनेते प्रकाश पाटील हेदेखील यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा