ब्युरो टीम : महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत परिसरातील कामांची पाहणी केली.
पुतळा परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरण व विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत श्री. खारगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परिसराचे जतन आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांनी संबंधित यंत्रणांनी यापुढेही दर्जेदार कामे करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर श्री. खारगे यांनी राजकोट परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासह पर्यटन पूरक सुविधांच्या विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक जतन आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रस्तावित कामांच्या नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही त्यांनी चर्चा केली.
यावेळी बोलताना श्री. खारगे म्हणाले की, राजकोट किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा वारसा आहे. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक मूल्य अबाधित राखणे आवश्यक आहे. या दृष्टीने परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिसरात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी मालवण नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच पर्यटन विकास करताना ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य देण्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा