PCMC : १५ ऑगस्टपासून कचरा विलगीकरण सक्तीचे; नियमभंग करणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही!

ब्युरो टीम : शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियमांची १५ ऑगस्ट २०२६ पासून कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार, घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांत विलगीकरण करणे अनिवार्य राहणार आहे. विलगीकरण न केलेला कचरा १५ ऑगस्टपासून महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत स्वीकारला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, नागरिकांसह मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठीही हे नियम बंधनकारक असतील.

घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विकेंद्रित कचरा व्यवस्थापन प्रणालीला प्राधान्य देण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होऊन स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी आता स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १५ ऑगस्टनंतर अशा आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. संबंधित आस्थापनांनी त्यांच्या परिसरातच निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक राहणार आहे. 

महापालिकेने नागरिकांना घरगुती कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, व्यावसायिक आस्थापना आणि इतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनीही कचऱ्याचे योग्य विलगीकरण करणे आवश्यक राहणार आहे.

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे, पुनर्वापराला चालना देणे आणि लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने महापालिकेचा हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा विलगीकरण हा केवळ नियम नसून, आपल्या शहराच्या भविष्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी आहे. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारावी.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी कचरा विलगीकरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारल्याशिवाय प्रभावी घनकचरा व्यवस्थापन शक्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.”

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्रे उभारून विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला गती दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होऊन प्रक्रिया अधिक प्रभावी पद्धतीने करता येईल. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.”

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही. प्रत्येक घरातून आणि प्रत्येक आस्थापनातून कचऱ्याचे चार प्रकारांत विलगीकरण होणे ही काळाची गरज आहे. योग्य वर्गीकरणामुळे कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे, पुनर्वापराला चालना देणे आणि लँडफिलवर जाणारा कचरा मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपूर्वीच कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व नागरिकांना कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने