यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणात पसार असलेला आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अहमदनगर शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे.संबंधित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी बोठेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. ही हत्या बोठे याने सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप आहे. तसा गुन्हा बोठेविरूद्ध पारनेर तालुक्यातील सुपे पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये सत्र न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र, आता घटनेला महिना होत आला तरीही बोठे अद्याप पसार आहे. अशातच आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे. एका विवाहित तरूणीने नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात बोठे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बोठे याने वेळोवेळी आपला विनयभंग केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० याकाळात वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा