Sangli : पावसाळ्यापूर्वी सांगली पेठ रस्त्याचे काम पूर्ण करावे, जिल्हाधिकारी अशोक काकडे

ब्युरो टीम : सांगली पेठ रस्त्याचे काम कालमर्यादा निश्चित करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.

सांगली पेठ रस्त्याच्या कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, उपजिल्हाधिकारी (समन्वय) वसुंधरा बारवे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम. राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. पी. नाईक, वाळव्याच्या उपअधीक्षक, भूमिअभिलेख सुजाता माळी यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार उपस्थित होते.

सांगली ते पेठ नाका हा महामार्ग अनेकांच्या दैनंदिन वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होऊन चांगला, दर्जेदार रस्ता व्हावा, यासाठी नागरिक वारंवार पाठपुरावा करत आहेत. या अनुषंगाने कामाच्या आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली पेठ रस्त्याच्या निवाड्याचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जे निवाडे केले होते, त्यांच्या मान्यतेची बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झाली आहे. त्या सर्व आठही निवाड्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने महिनाअखेरपर्यंत निवाडे झालेल्या खातेदारांना निधीवाटपाच्या अनुषंगाने नोटिसा देण्याची कार्यवाही करावी. कंत्राटदारांनी पावसाळ्याच्या आत रस्ता तयार करावा, जेणेकरून नागरिकांची सोय होईल व रस्त्याचे दोन्ही भाग मे अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ज्या ठिकाणी तांत्रिक मुद्दे राहिले असतील, ते दूर करावेत. कोणत्याही प्रकारे भूसंपादन अपूर्ण राहिले नसल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. उपविभागीय अधिकारी इस्लामपूर आणि मिरज यांनी खातेदारांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बैठक घ्यावी. खातेदारांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवावी, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी कार्यकारी अभियंता एस. पी. नाईक यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाड्याची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे उपस्थितांना अवगत केले. पावसाळ्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करू, अशी ग्वाही कंत्राटदारांनी यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने