Box Office : बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस: ‘भूल चूक माफ’ चमकली


ब्युरो टीम : सध्या भारतीय सिनेमागृहांमध्ये अनेक नव्या आणि जुन्या चित्रपटांनी गर्दी केली आहे. प्रेक्षकांना एंटरटेन करणाऱ्या या चित्रपटांमध्ये अजय देवगनची ‘रेड 2’, राजकुमार रावची ‘भूल चूक माफ’, तसेच हॉलिवूडमधील ‘मिशन इम्पॉसिबल 8’ यांचा समावेश आहे. चला तर पाहूया, कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली आहे

भूल चूक माफ

राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाला पहिल्याच वीकेंडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २५ मे रोजी रविवारी चित्रपटाने ११.२५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी ७ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ९.५ कोटींची कमाई करत, या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २७.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

केसरी वीर

सूरज पांचोली आणि सुनील शेट्टी यांच्या ‘केसरी वीर’ या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. रविवारी केवळ ३२ लाखांची कमाई करत, एकूण गल्ला केवळ ८८ लाखांवर पोहोचला आहे. वीकेंड संपतानाही हा चित्रपट १ कोटी पार करू शकलेला नाही.

रेड 2

अजय देवगन आणि वाणी कपूर यांचा ‘रेड 2’ अजूनही थिएटर्समध्ये टिकून आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या २५व्या दिवशी २.४ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाचा एकूण गल्ला १६२.१० कोटींवर पोहोचला आहे, जो एक मोठा विक्रम मानला जातोय.

मिशन इम्पॉसिबल: द फाइनल रेकनिंग

१७ मे रोजी प्रदर्शित झालेला टॉम क्रूजचा ‘मिशन इम्पॉसिबल 8’ हाही चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. दुसऱ्या रविवारी त्याने ७ कोटींची कमाई केली असून, एकूण कमाई आता ७२.३० कोटींवर पोहोचली आहे. भारतातही टॉम क्रूजचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो आहे.

कंपकंपी

तुषार कपूरचा ‘कंपकंपी’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला. रविवारी त्याने ३८ लाखांची कमाई केली असून, एकूण गल्ला आता ९२ लाखांवर पोहोचला आहे. चित्रपटाची कामगिरी संमिश्र आहे.

लोलो अँड स्टिच

२३ मे रोजी प्रदर्शित झालेली हॉलिवूडची ‘लोलो अँड स्टिच’ हिला भारतीय प्रेक्षकांचा थोडाफार प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या चित्रपटाने ३.३ कोटींची कमाई केली आहे.

या आठवड्यात ‘भूल चूक माफ’ सर्वाधिक कमाई करणारा नवीन चित्रपट ठरला आहे. ‘रेड 2’ अजूनही दमदार कामगिरी करत आहे, तर ‘केसरी वीर’ आणि ‘कंपकंपी’ सारखे चित्रपट अपेक्षांवर उतरलेले नाहीत. हॉलिवूड चित्रपटांनाही प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने