आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आठ प्रभागांतून २ हजार २७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. छाननीनंतर त्यांपैकी ७८६ सूचना स्वीकारण्यात आल्या आणि नागरिकांनी सुचवलेल्या तब्बल ४९९ कामांना निधी देण्यात आला. नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी ९४.८६ कोटी रुपये राखीव निधी ठेवण्यात आला होता. मात्र महापालिकेने नागरिकांनी सुचवलेल्या सामाजिक कामांना प्राधान्य देताना या कामांसाठी १३८.९८ कोटी रुपयांचा निधी वाटप केला.
ड प्रभागाला सर्वात जास्त लाभ
नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार सर्वात जास्त लाभ ड प्रभागाला झाला आहे. या प्रभागातील पुनावळे, ताथवडे, वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांनी सुचवलेली विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. येथे मुख्य रस्त्यांची कामे, ड्रेनेजची कामे आणि उद्यानांसाठी ४३.८८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. ब प्रभागातील रावेत, किवळे या भागातील कामांसाठी २०.६० कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीत रस्त्यांच्या कामांपासून रावेतमधील नवीन महापालिका शाळेपर्यंतची कामे समाविष्ट आहेत. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांतून आलेल्या नागरिकांच्या सूचनांमध्ये रस्त्यांची कामे, पादचारी मार्ग, उद्यान सुधारणा, कचरा व्यवस्थापन अशा प्रमुख कामांचा समावेश होता. तसेच सर्वच प्रभागांत सार्वजनिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, थेरगावमध्ये शहरी रस्ता डिझाईन मानकांनुसार पादचारी मार्ग बांधणे आणि पिंपरी गावात रेल्वे उड्डाणपूल विकसित करणे अशा कामांचाही समावेश होता.
नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. आता नागरिकांकडून पुन्हा अर्थसंकल्प २०२६-२७ साठी सूचना मागवण्यात येणार असून त्याची सुरुवात १५ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे.
अर्थसंकल्प २०२६-२७ असा नोंदवा अभिप्राय
- पिंपरी चिंचवडचा कोणताही रहिवासी अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये कोणते काम घ्यावे, याबाबत सूचना देऊ शकतो.
- पिंपरी चिंचवड महापालिका संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून नागरिकांना सूचना देता येतील.
- नागरिकांना ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक प्रभाग कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
- हा निधी रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, सार्वजनिक सुविधा, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सुरक्षा उपाय अशा कामांसाठी वापरला जाईल.
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घेतल्याने अर्थसंकल्प सर्वसमावेशक होत असून यामुळे शहरातील गरजांनुसार नागरी सुविधांचा विकास होण्यास मदत होत आहे. अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी निधीची तरतूद केली आहे. आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ साठी पुन्हा एकदा नागरिकांना सहभाग नोंदवता येणार आहे.
— शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी ज्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते, तो निधी त्याच कामासाठी खर्च होईल, याची काळजी घेतली जाते. हा निधी वाटपाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते. यंदाही जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन अर्थसंकल्प २०२६-२७ साठी कामे सुचवावीत.
— प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
टिप्पणी पोस्ट करा